औरंगाबाद लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा असा आग्रह गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीने धरला आहे. वीस वर्षांपासून हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीचा आग्रह पाहून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आ. चव्हाणांनी घड्याळाऐवजी पंजाच्या चिन्हांवर लोकसभा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव दिला असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून कळाले आहे. तर जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यार असल्याचे कळते. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात खा. चंद्रकांत खैरे यांना आ. सतीश चव्हाण शह देण्याच्या प्रयत्नात आहेत. तर जालना लोकसभा मतदार संघातून खा. रावसाहेब दानवे यांना आ. अब्दुल सत्तार हे मोठे आव्हान देणार असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल रविवारी वाजला. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रात चार टप्प्यांत म्हणजे 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. औरंगाबाद आणि जालना मतदार संघात तिसर्या टप्प्यांत 23 एप्रिल रोजी मतदार होणार आहे. औरंगाबादमधून शिवसेनेतर्फे चंद्रकांत खैरे यांचे तर जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची नावे निश्चित आहेत. या दोघांनी निवडणूक प्रचाराला सुरुवातही केली आहे. खा. दानवे आणि खा. खैरे चारवेळेस निवडून आलेले आहे. या दोघांना यावेळी पराभूत करण्यासाठी काँग्रेस आघाडीने निश्चित केले आहे. हे दोन्ही मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे आहेत. औरंगाबादचा मतदार संघ काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडावा असा आग्रह आहे. या मतदार संघाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अनेकवेळा चर्चा झाली. पण त्यावर निर्णय झाला नाही. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीची नगरची जागा मागितली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुजय विखे यांनी घड्याळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असे सांगितले. त्याच धर्तीवर औरंगाबादच्या जागेवर आ. सतीश चव्हाण यांनी घड्याळाऐवजी पंजाचे चिन्ह घेऊन लढावे असे सांगितले. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस पक्षाची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत औरंगाबादचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. आ. सतीश चव्हाण यांनी पंजा चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत राष्ट्रवादीत चर्चा झाली असून राष्ट्रवादीकडून आ. चव्हाण यांना ग्रीन सिग्नल दिल्याचे कळते. त्यामुळे आ. सतीश चव्हाण घड्याळ सोडून पंजा चिन्हावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आ. सत्तार जालन्यातून नशीब अजमवणार?
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. राज्यातून काँग्रेस पक्षाला जातीय समीकरणे जुळवून आणण्याच्या दृष्टीने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आ. अब्दुल सत्तार यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्ष उमेदवारी देण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. आ. सत्तार आणि खा. दानवे यांचे राजकीय वैरत्व आहे. यातून सत्तार यांनी खा. दानवेेंचा पराभव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भांग पाडणार नाही, अशी प्रतिज्ञा केलेली आहे. आ. सत्तार यांचा जालना लोकसभा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. सिल्लोड, सोयगाव, भोकरदन, जाफराबाद, जालना शहर, परतूर येथेही काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे दानवेंच्या पराभवासाठी सत्तार हे प्रबळ उमेदवार असल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.